ताज्या बातम्यामराठवाडामहाराष्ट्र

पैठण, सोयगाव, सिल्लोडसह 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता !

मुंबई दि. 12 : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. 82 पैकी 20 वसतिगृहे सुरु असून उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना घेतला होता. बीड, अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती. यांपैकी आतापर्यंत 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यात यावेत, याबाबत मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यात 62 वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही वसतिगृहे सुरुवातीस भाड्याच्या जागेत चालवली जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून खुली करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यादृष्टीने ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास व भोजनाची उत्तम सोय व्हावी, या दृष्टीने ही वसतिगृहे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या पुढील पिढ्यांच्या हातात कोयता येऊ नये, या दृष्टीने शासनाचे हे अत्यंत मोठे पाऊल आहे. वसतिगृहे सुरु करण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

या ठिकाणी सुरू होणार प्रत्येकी दोन वसतिगृहे :-

बीड जिल्हा – वडवणी, धारूर, शिरूर कासार, आष्टी, अंबाजोगाई

अहमदनगर – शेवगाव

जालना – परतूर, बदनापूर, जालना, मंठा

नांदेड – कंधार, मुखेड, लोहा

परभणी – गंगाखेड, पालम, सोनपेठ

धाराशिव – कळंब, भूम, परांडा

लातूर – रेणापूर, जळकोट

छत्रपती संभाजीनगर – पैठण, सोयगाव, सिल्लोड

नाशिक – निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर

जळगाव – एरंडोल, यावल, चाळीसगाव

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!