ताज्या बातम्यादेशविदेशमहाराष्ट्र

नाशिककरांच्या प्रेमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बरसात, रोड शोच्या माध्यमातून अभिवादन स्वीकारत मोदींनी जिंकली नाशिककरांची मने !

नाशिक, दि. 12 : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हासित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. प्रधानमंत्री मोदी यांच्या या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले.

आज सकाळी प्रधानमंत्री मोदी यांचे निलगिरी बाग हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यानंतर हॉटेल मिर्ची चौकातून केशरी रंगाच्या आणि फुलांनी सजवलेल्या खुल्या जीपमधून मोदी यांच्या ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यावेळी त्यांच्यासमवेत होते.

नाशिकच्या युवा वर्गाने केलेली गर्दी, महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद, दुतर्फा सजलेले रस्ते अशा वातावरणात तपोवनाच्या दिशेने निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ठिकठिकाणी आपुलकी आणि प्रेमाने केलेल्या स्वागताचा अनुभव आला. उपस्थितांच्या दिशेने हात उंचावत तसेच उपस्थितांना अभिवादन करत प्रधानमंत्री मोदी यांचा ताफा तपोवनकडे निघाला. जागोजागी हजारोंच्या संख्येने थांबलेले नाशिककर आपल्या प्रधानमंत्र्यांचे स्वागत उत्साहात करत होते.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

लेझिम पथक, ढोलपथक, पारंपरिक वाद्ये यांच्या साहाय्याने आणि नृत्य करत विविध पथके या मार्गावर प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत करत होती. प्रधानमंत्री मोदी यांना जवळून पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. लेझिम पथक, ढोल पथक आणि विविध वेशभूषेतील युवक युवतींनी सारा परिसर जणू चैतन्याने भरून गेला होता. प्रधानमंत्री मोदी यांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने परिसरातील वातावरण चैतन्याने भारून गेले. हॉटेल मिर्ची ते तपोवन पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर केवळ आणि केवळ अमाप उत्साह, चैतन्य, आनंदाचे वातावरण होते. हातात तिरंगा घेऊन आणि भगवे झेंडे हाती घेत युवकांनी प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विविध ठिकाणच्या युवा मंडळांनी मल्लखांब प्रात्यक्षिके, पारंपरिक कलांचा आविष्कार यावेळी सादर केला. त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या आणि बाल वारकऱ्यांचा समावेश असलेल्या दिंडीने विशेष लक्ष वेधले. आदिवासी आणि पारंपरिक लोकनृत्य, पंजाबी नृत्य अशा विविध पद्धतीने आणि विविध रंगी वेशभूषा करून नागरिकांनी प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!