ताज्या बातम्यामहाराष्ट्र

माविम बचतगटांना आणि समूह संसाधन व्यक्तींना उमेदप्रमाणे फिरता निधी देण्याबाबतच्या प्रस्तावाचे निर्देश, मानधनही मिळणार !

मुंबई, दि.14: महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व उमेद यांच्या माध्यमातून राज्यात बचतगटांची निर्मिती करून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य केले जात आहे. ‘माविम’च्या गटांना ‘उमेद’प्रमाणे फिरता निधी मिळावा आणि समूह संसाधन व्यक्तींना ‘उमेद’प्रमाणे मानधन मिळावे याबाबतचा प्रस्ताव तपासून सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या, ‘उमेद’प्रमाणे ‘माविम’ बचतगटांना लाभ मिळावा अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वित्त विभागास पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रमाच्या बैठकी दरम्यान देण्यात आल्या आहेत. तसेच ‘माविम’च्या सर्व बचतगटांची माहिती NRLM (उमेद) पोर्टलवर टाकण्याचे काम सुरू असून या कामात गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याचबरोबर लोकसंचालित साधन केंद्र यांनी निवेदनामध्ये नमूद केलेल्या इतर मागण्यांची तपासणी करून याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्याही सूचना विभागास देण्यात आल्या आहेत.

‘माविम’ हे शाश्वत विकासाचे मॉडेल म्हणून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करत आहे. यामध्ये बचतगटांचे फेडरेशन लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) यांना तांत्रिक सहाय्य माविम उपलब्ध करून देत आहे. याशिवाय त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे याकरिता विविध उपक्रमाशी त्यांना जोडून देण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील लोकसंचालित साधन केंद्रांचे उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्न आहे. जसे जसे त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील तसे कर्मचाऱ्यांचे मानधन व इतर लाभ देण्याकरिता प्रयत्न करता येतील असेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!