निलेश लंकेची विखेंना भीती, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट ! निलेश लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या असा निरोप घेवून उद्योगपतीला पाठवलं !!
साहेबांना सांगा, की निलेश लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या असा निरोप घेवून माझ्याकडे एका उद्योगपतीला पाठवले- शरद पवार
अहमदनगर, दि. २० – मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, या लोकांना आत्मविश्वास नाहीये. निवडणुकीला उभे राहतात, त्यांना निलेश लंकेची चिंता नक्की वाटत असेल. मी जाहीर पणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो. मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं तीन आठवड्यांपूर्वी. ते उद्योगपती माझ्याकडे आले म्हटले, “महसूल मंत्र्यांची विनंती आहे.” मी म्हटलं, “महसूल मंत्र्यांची विनंती आणि तुमचा काय संबंध?” “नाही, थोडे आमचे संबंध त्यांच्याशी असतात, त्यांनी एक मला विनंती केली, की काहीही करून पवार साहेबांकडे जा, आणि पवार साहेबांना सांगा, की निलेश लंके सोडून दुसरा कोणताही उमेदवार द्या.” ही विनंती मला स्वतःला केली गेली. त्यांना निलेश लंके यांचं नाव आलं त्यावेळेला ज्यांची झोप उडाली ज्यांनी भाजपच्या दारात कधीही पाऊल टाकलेलं नाही, त्यांनी एका मोठ्या माणसाला माझ्याकडे पाठवलं. याचा अर्थ हा आहे की तुमच्याकडे सत्ता असेल, तुमच्याकडे साधनं असतील तर इथं माणुसकी आणि सामान्य माणसाचा प्रेम हा खजिना ज्यांच्याकडे आहे, त्या निलेश लंकेचा पराजय करणं त्यांना शक्य नाही, असा आत्मविश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलून दाखवला.
अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या आहिल्यानगर येथील स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या समारोप सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, आपल्या सगळ्यांचे नेते बाळासाहेब थोरात, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी इंदोरहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले, अहिल्यादेवी आणि मल्हारराव होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार, ज्यांच्या निवडीसाठी आपण सर्वजण अतिशय उत्सुक आहात ते आपल्या सगळ्यांचे अत्यंत लोकप्रिय उमेदवार निलेश लंके, व्यासपीठावरील शिवसेना, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, डावे उजवे कम्युनिस्ट पक्ष, या सगळ्या पक्षांचे या ठिकाणी उपस्थित असलेले नेते व हजारोंच्या संख्येने बराच वेळ या ठिकाणी आहात ते आपण सगळे बंधू-भगिनींनो..!
निलेश लंके यांनी जी यात्रा काढली होती, गावोगावी गेले, लोकांना भेटले, त्यांची सुखदुःख समजून घेतली- बऱ्याच दिवसांतून आज मी गांधी मैदानावर बोलत आहे. एक काळ असा होता, की माझी सभा म्हटल्यानंतर ती गांधी मैदानावरच व्हायची आणि या मैदानाला इतिहास आहे. अनेक प्रश्नांसाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घेतल्या आणि आज गेले काही दिवस निलेश लंके यांनी जी यात्रा काढली होती, गावोगावी गेले, लोकांना भेटले, त्यांची सुखदुःख समजून घेतली, आणि आपल्या सगळ्यांची आपल्या खांद्यावरची जबाबदारी पडणार आहे, ती सोडवण्यासाठी, पेलवण्यासाठी स्वतःची तयारी त्यांनी या ठिकाणी केली. त्या यात्रेचा आजचा सांगता दिवस आहे. तुम्हा सर्वांच्या वतीने निलेश लंके यांना मी अंतकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो, की जे काम हातात घेतले आणि ज्यांच्यासाठी घेतले त्यांच्याशी त्यांनी पहिल्यांदा संवाद साधला. माझ्या वाचनामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की पार्लमेंट मध्ये कोणत्या भाषेत बोलाल, हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला ते पार्लमेंटचे सभासद होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांना हे समजायला हवं होतं, पार्लमेंट मध्ये कोणत्याही भाषेत बोलण्याचा अधिकार आहे. पार्लमेंटमध्ये मी स्वतः कधी इंग्रजीत बोललो, कधी हिंदीमध्ये बोललो, आणि कधी शुद्ध मराठी मध्ये सुद्धा बोललो. मराठीत बोलण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी आहे, आणि तुमच्या भाषणाचं शब्दश: हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिथे भाषांतर होतं. त्यामुळे निलेश लंके या जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
शाळेत जाणाऱ्या मुली तीन-तीन चार-चार मैल चालत जायच्या त्याच्यात लक्ष घातलं आणि आज हजार मुलींना सायकली मोफत दिल्या- आज या ठिकाणी एका गोष्टीचा मला आनंद आहे. मला असं समजलं की निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके इथे खाली बसल्या आहेत. त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे मी इथे फुलं आणून ठेवली होती, त्यांनी दुसऱ्याला दिली त्यांचा स्वभाव असाच आहे स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही. या दोघांचंही मी अंत: करणापासून अभिनंदन करतो. राणी लंके यांचे मी अभिनंदन करतो आपला नवरा त्यांनी सांभाळावा. अखंड लोकांच्यात असतो, घरात राहत नाही. त्यांचे काम त्यांनी अखंड पणाने केले आणि हे महाराष्ट्राने बघितले आहे. शाळेत जाणाऱ्या मुली तीन-तीन चार-चार मैल चालत जायच्या त्याच्यात लक्ष घातलं आणि आज हजार मुलींना सायकली मोफत दिल्या. अशी अनेक काम आपल्या आयुष्यामध्ये केली.
लोकसभेमध्ये जाण्याचा रस्ता, ज्यांनी खुला केला आज त्यांच्या कुटुंबावर टीकाटिपणी करायची त्याचा अर्थ काय?- टीका करणाऱ्या लोकांबद्दल मला आज काही जास्त बोलायचे नाही. ते माझ्यावरही टीका करतात. बाळासाहेबांवरही टीका करतात. मला हे आठवतं नाही की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असो किंवा माझ्या जीवनामध्ये असो काही ना काहीतरी मदत त्यांना झालेली आहे. बाळासाहेब यांना आठवत असेल किंवा नसेल. बाळासाहेब विखे यांना निवडणुकीला उभे राहायचं होतं, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्यांची निवडणूक सोपी नव्हती, त्यांना यश संपादन करायचं असेल तर भाऊसाहेब थोरात यांची त्यांना मदत हवी होती आणि ती मदत मिळेल याची खात्री त्यांना नव्हती. माझ्यासमोर हा प्रश्न मांडला, मी जिल्ह्यात दौऱ्याला होतो, रात्री एक वाजेपर्यंत माझ्या बैठका चालू होत्या आणि त्यानंतर हा प्रश्न माझ्यापुढे मांडला. मी बाळासाहेबांना म्हटलं, की चला गाडीत बसूया, आपण भाऊसाहेब थोरात यांच्या गावी जाऊया, भाऊसाहेबांना भेटू या. त्यांची काही तक्रार असेल, आपली काही चूकभूल असेल तर माफी मागूया, दुरुस्त करूया आणि पहाटे रात्री ३ वाजता बाळासाहेबांना मी घेऊन गेलो, भाऊ साहेबांना झोपेतून उठवलं, त्यांच्याशी विचार विनिमय केला, झालं गेलं विसरून जा अशी विनंती केली, त्यांनी मोठ्या अंतकरणांनी सगळ्या गोष्टी माफ केल्या आणि शब्द दिला की आम्ही तुम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करू आणि तो विजय त्यांनी संपादित करून दाखवला. त्यामुळे ज्या लोकांना त्यांची राजकारणातली, संसदेतली, त्याआधी जिल्हा परिषद, सहकारी संस्था हे होते. पण लोकसभेमध्ये जाण्याचा रस्ता, ज्यांनी खुला केला आज त्यांच्या कुटुंबावर टीकाटिपणी करायची त्याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की माणुसकी नाही. अनेकांवर टीका केली जाते. आता या लोकांबद्दल काय सांगायचं, जे लोक किती पक्ष बदललेले आहेत. कधी शिवसेनेत होते, शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले विरोधी पक्षनेता झाले, विरोधी पक्षनेते पद उपभोगलं, ते सोडून दिलं भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसलेत आणि ते आज टीकाटिपणी करत असतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्टाने घटना आपल्याला दिली- कुठे शेतीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, तरुणांना रोजगाराच्या संबंधित प्रश्न आहेत, उपेक्षित समाज महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे प्रश्न आहेत. हे सगळं बदलायचं असेल तर एक भक्कम सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे. आज ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे, त्यांना लोकांच्या प्रश्नांसंबंधी यतकिंचितही आस्था नाही. अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांच्याबद्दल टीका सबंध देशामध्ये केली गेली. लोक त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करतात यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा लोकशाही आणि संविधान हे शिल्लक राहणार की नाही? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्टाने घटना आपल्याला दिली. त्यामुळे हा देश एकसंघ राहिला. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये अशी घटना नव्हती, त्यामुळे अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. पाकिस्तानचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. बांगलादेशचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. श्रीलंकेचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. नेपाळचे उदाहरण घ्या, तिथे हुकूमशाही होती. भारतामध्ये कधी हुकूमशाही नव्हती, त्याचे महत्त्वाचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घटना आपल्याला दिली, की त्या घटनेच्या जोरावर हा देश एकसंघ राहिलेला आहे. पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधी काहीतरी चुकीचा विचार हा राज्यकर्त्यांच्या डोक्यात येतो की काय अशी शंका आमच्या मनात आहे. यांनी पुन्हा सत्ता हातात घेतली तर सत्तेचा गैरवापर करतील. ते जर पुन्हा होऊ द्यायचं नसेल तर लंके यांना विजयी केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपाचा पराभव करणे तुमच्या माझ्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
व्यापाऱ्यांमध्ये इथे दहशत आहे. नगरसारख्या शहरात दहशत आणि याची व्यापाऱ्यांना चिंता वाटावी अशी स्थिती?- अजून सुरुवात आहे. सुरुवात झाल्यानंतर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, ज्या गावात तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही राहता आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला लंके यांची निवडणूक त्या व्यक्तीच्या भवितव्याच्या दृष्टीने किती महत्त्वाची निवडणूक आहे, हे त्यांना समजावून सांगा. त्यासाठी त्यांना बोलावून घ्या. जे काही तुमचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांतून मार्ग काढू. आज मला इथले उद्योजक भेटले, त्यांनी दोन प्रश्न सांगितले. व्यापाऱ्यांमध्ये इथे दहशत आहे. नगरसारख्या शहरात दहशत आणि याची व्यापाऱ्यांना चिंता वाटावी अशी स्थिती? त्या उद्योजकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी नगरच्या औद्योगिक एमआयडीसीमध्ये काही नवीन कारखाने यावेत. त्या एमआयडीसीचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावे. याच्याकडे त्यांचे लक्ष नाही. मी निलेश लंके यांना एवढेच सांगतो की तुम्ही या मतदारसंघातले प्रश्न सोडवा. जे काही करायचे असेल ते खासदार म्हणून करा. हे जे दोन प्रश्न आहेत, एमआयडीसीचे आणि व्यापाऱ्यांचे हे दोन प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर मला आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब थोरात आम्हा दोघांना कधीही बोलवा हे प्रश्न कसे सुटत नाहीत, ते आम्ही बघतो. त्या सर्वांची जबाबदारी मी स्वतः घेतो, असे पवार म्हणाले.