उद्योजकांसाठी महावितरणतर्फे स्वागत सेल: नवीन वीजजोडणी, बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण !
छत्रपती संभाजीनगर, दि. १३ : औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी महावितरणकडून छत्रपती संभाजीनगर परिमंडलांतर्गत ग्रामीण व शहर मंडल कार्यालयांत स्वागत सेल सुरू करण्यात आले आहेत. उद्योजकांमध्ये या उपक्रमाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत सेलचे मंगळवारी (13 फेब्रुवारी) औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
महावितरणचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीएमआयए’चे सचिव उत्सव माछर व ‘मसिआ’चे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते अनुक्रमे शहर व ग्रामीण मंडल स्वागत सेलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘सीएमआयए’चे पदाधिकारी रवींद्र मानवतकर, ‘मसिआ’चे पदाधिकारी चेतन राऊत, कमलाकर पाटील, मनीष अग्रवाल, दुष्यंत आठवले, अभिषेक मोदाणी, सुरेश खिल्लारे, वीरेन पाटील यांच्यासह महावितरणचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी (शहर), प्रवीण दरोली (ग्रामीण), कार्यकारी अभियंता सतीश खाकसे, प्रेरणा बनकर, शैलेश कलंत्री, भूषण पहूरकर, वरिष्ठ व्यवस्थापक नितीन पाडसवान, व्यवस्थापक सखाराम जरारे, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे म्हणाले की, औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वागत सेल सुरू करण्यात आले आहेत. सध्या असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून महावितरणतर्फे ही अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आली आहे. स्वागत सेलशी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांशी संपर्क साधून विनाविलंब सेवा देणार आहेत.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
यावेळी छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उद्योजकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी कामे मार्गी लागल्याची माहिती डॉ.केळे यांनी दिली. मुरमी येथे 220 केव्ही क्षमतेच्या विद्युत उपकेंद्रासह करोडीतील 33 केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतावाढीस मंजुरी मिळाली आहे. याबरोबरच बिडकीन व वाळूज या दोन नवीन उपविभागांसह दोन नवीन शाखा कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. वाळूज महानगर, रांजणगाव व लिंबेजळगाव उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतावाढीचे प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे, असे डॉ.केळे म्हणाले.
यावेळी उत्सव माछर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून महावितरण यापुढेही दर्जेदार सेवा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. अनिल पाटील म्हणाले की, स्वागत सेलची संकल्पना स्तुत्य असून, उद्योजकांच्या समस्या तत्परतेने सुटतील.
असा आहे स्वागत सेल
महावितरणच्या मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारित या सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता (प्रशासन) तसेच व्यवस्थापक (वित्त व लेखा) यांच्यासह उपकार्यकारी अभियंता (उच्चदाब) यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडल कार्यालयाच्या स्वागत सेलचा संपर्क क्रमांक 7875431555 असून, swagatcell_ch.sambhajinagarr@mahadiscom.in हा ईमेल आहे. तर शहर मंडल कार्यालयाच्या स्वागत सेलचा 7066042399 हा संपर्क क्रमांक व swagatcell_ch.sambhajinagar@mahadiscom.in हा ईमेल आहे. औद्योगिक ग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महा वितरणतर्फे करण्यात आले आहे.