ताज्या बातम्यामराठवाडा

फुलंब्री तालुक्यातील बोधेगावच्या अल्पवयीन मुलीचा खुलताबाद तालुक्यातील ताजनापूरच्या मुलासोबतचा नियोजित विवाह सोहळा दामिनी पथकाने रोखला !

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ – फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर गावच्या मुलासोबतचा नियोजित विवाह सोहळा दामिनी पथकाने रोखला.

छत्रपती संभाजी नगर ग्रामीण दामिनी पथक प्रमुख सपोनि आरती जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, वडोदबाजार हद्दीतील बोधेगाव (खु) ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलींचे दिनांक १७/०१/२०२४ रोजी खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर या गावाच्या मुलासोबत विवाह व इतर विधी संपन्न होणार आहे.

या माहितीवरून पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या सूचनाप्रमाणे दामिनी पथकाच्या स.पो.नि आरती जाधव यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन माहिती घेतलेली असता तेथे विवाह सोहळा होणार असल्याबाबची पूर्ण तयारी दिसून आली. यावरुन दामिनी पथकाने तात्काळ मुलीच्या आई- वडिलांची भेट घेतली असता हे कुटुंब अशिक्षित असून गरीब असल्याचे समजले. त्यांना विश्वासात घेवून अधिक चर्चा केली असता नात्यातीलच चांगल्या मुलाचे लग्नासाठी मागणी आल्याने व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्याने व मुलीचे वय अंदाजे 18 वर्ष पूर्ण झाले असतील अशा गैरसमजातून त्यांनी मुलीचा विवाह लावून देत असल्याचे मान्य केले.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

परंतु पथकातील पोलिसांनी गावातील जिल्हा परीषद शाळेतून सदर मुलीचा प्रवेश निर्गम उतारा हस्तगत करून त्या आधारे मुलींचे वय १६ वर्षे असल्याचे निष्पन्न करून ती अल्पवयीन असल्याबाबत आई-वडिलांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरुन दामिनी पथकांचे सपोनि आरती जाधव व चाईल्ड लाईनचे समुपदेशक सचिन दौड यांनी बालविवाहामुळे मुलींच्या आयुष्याबाबत होणा-या दुष्परिणामा बाबत व कायदेशिर बाबची संपूर्ण माहिती देवून पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले. त्यामुळे आई- वडील यांचे मन व मत परिवर्तन होऊन त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले आहे.
तसेच मुलगी ही सज्ञान झाल्यानंतरच तिच्या मर्जीनुसार तिचा विवाह करू असे आवर्जून सांगितले. याबाबत चाईल्ड लाईनचे समुपदेशक यांनी याबाबत बंधपत्र लिहून घेऊन सदर मुलीला बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येवून त्यांचे निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुलींच्या आई-वडील व इतर नातेवाईक यांना बालविवाह संदर्भात कायदेशिर बाबीचे माहिती देऊन मुलीचे अल्पवयात लग्न करणे हा कायदेशीर रित्या गुन्हा असून असा जाणीवपूर्वक बालविवाह ठरविण्यास किंवा त्यास प्रोत्साहन तसेच सोहळा पार पाडणा-यास दोन वर्ष सक्त मजुरी व दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार होऊ शकते यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांचा लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चत्तम शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे. ज्यामुळे भविष्यात मुली स्वताच्या पायावर उभे राहून तिचे स्वताचे उज्वल भविष्य निर्माण करुन समाजात एक विशिष्ट ओळख निर्माण करु शकेल.

ही कारवाई दामिनी पथकाच्या स.पो.नि आरती जाधव, चाईल्ड लाईनचे समुपदेशक सचिन दौड, पोलीस अंमलदार इंशांद पठाण, जयश्री महालकर, शंकर चव्हाण, गोरे यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!