ताज्या बातम्यामराठवाडा
Trending

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश जारी ! शस्त्र बाळगण्यास निर्बंध, कार्यालय परिसरात आंदोलन करण्यास निर्बंध !!

सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे, बॅनर लावण्यास निर्बंध

छत्रपती संभाजीनगर, दि.१८ :- लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासोबतच जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत.

खाजगी इमारत, भिंत इ. चा निवडणूक प्रचार वापरास पूर्व परवानगी आवश्यक

निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भिंत इ. चा वापर संबंधित मालकाच्या परवानगी शिवाय तसेच संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

नमूना मतपत्रिका छपाईस निर्बंध

निवडणूक प्रचारा दरम्यान राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने, त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी, मुद्रणालयाच्या मालकांनी, प्रकाशकांनी नमुना मतपत्रिका छापतांना उमेदवाराचे नाव, नेमून देण्यात आलेली चिन्हे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद, आकार वापरणे इ. करण्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ (क) अन्वये निर्बंध घालण्यात आले आहे.

ध्वनीक्षेपकाच्या वापरास निर्बंध

निवडणूक प्रचारादरम्यान ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहे. त्यात संबंधित पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर करण्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे ३३ (एन) अन्वये निर्बंध असून सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ति यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपक वापर करण्याबाबत घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस बंधनकारक आहे.

प्रचार साहित्यामुळे रहदारीस अडथळा करण्यास निर्बंध

निवडणूक प्रचारादरम्यान लावण्यात येणाऱ्या पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट, कटआऊट, पेंटिंग, होर्डिंग, कमानी, घोषवाक्य लिहिणे इ. रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने लावण्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे ३३(१)(घक) अनवये निर्बंध घालण्यात आले आहेत.

शासकीय इमारत, आवार, परिसराचा प्रचारासाठी वापर करण्यास निर्बंध

निवडणूक प्रचारादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विश्रामगृहे यांच्या इमारत, आवार व परिसरात निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही प्रकारे वापर करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.

नामनिर्देशन दाखल करतांनाचे निर्बंध

उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन दाखल करतांना, पाच पेक्षा जास्त व्यक्तिं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उपस्थित असणे, नामनिर्देशन दाखल करते वेळी कार्यालय परिसरात मिरवणूक, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे इ. प्रकारे प्रचार करण्यास तसेच कार्यालयाच्या १०० मिटर परिसरात तीन पेक्षा जादा वाहने आणण्यास फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

शस्त्र बाळगण्यास निर्बंध

निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत शस्र परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास- वापरण्यास, शस्त्र परवाना देण्यास बंदी घालण्यात आली आहे. फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (अ) अन्वये हे निर्बंध घालण्यात आले आहेत.

कार्यालय परिसरात आंदोलन करण्यास निर्बंध

निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार या सर्व कार्यालयांच्या परिसरात उपोषण , मोर्चा, निदर्शने, घेराव इ. आंदोलने करण्यास फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलन १४४ अन्वये मनाई करण्यात आली आहे.

सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे, बॅनर इ.लावण्यास निर्बंध

निवडणूक प्रचारादरम्यान सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे, बॅनर, बोधचिन्ह इ. लावणे, घोषवाक्य लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे.

वरील सर्व निर्बंध, मनाई आदेश हे निवडणूक जाहीर झाल्यापासून (दि.१६ मार्च) ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.६ जून) पर्यंत अंमलात राहतील,असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!