ज्या कांद्याला परदेशात दोन पैसे मिळत होते, त्याला बंदी घालण्याचे पाप मोदी सरकारने केले : शरद पवार
करमाळा, सोलापूर, दि. २७- जिरायत भागामध्ये अनेक पिकं आहेत. कांदा एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. तुम्ही आजच्या वर्तमानपत्रातली माहिती वाचा, ज्या कांद्याला दोन पैसे बाहेर मिळत होते, परदेशात कांदा निर्यात करत होते, त्याला बंदी घातली आणि दोन पैसे कांदा उत्पादकांना जे मिळत होते, ते थांबवण्याचे पाप मोदीच्या सरकारने या ठिकाणी केले. लोकांनी अनेकांनी याबद्दलच्या तक्रारी केल्या टीका टिप्पणी केली, काही ठिकाणी मोर्चे काढले आणि काल त्यांनी नवीन निकाल घेतला. काय निकाल घेतला? कांदा निर्यात करायला परवानगी आहे, पण जो लाल कांदा आहे, त्याला नाही. फक्त पांढऱ्या कांद्याला घेतली आहे. तुम्ही सगळेजण शेतीच्या धंद्यातले लोक आहात, शंभरातले किती टक्के लोक पांढऱ्या कांद्याचे पीक घेतात? १० टक्के लोकसुद्धा पांढऱ्या कांद्याचे पीक घेत नाहीत. आपल्या सगळ्या भागांमध्ये तांबडा कांदा हा पिकवला जातो, त्या तांबड्या कांद्याची निर्यात आधी थांबवली आणि फक्त जो कांदा गुजरातमध्ये पिकतो, त्याची निर्यात करण्याबद्दलची संमती दिली, असा घाणाघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथील जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबाचे वारस श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, ज्यांचे विचार तुम्ही ऐकले ते शेजारच्या कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार, श्री. प्रविण गायकवाड, ज्यांचे आताच विचार आपण ऐकले, ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या बरोबर काम करण्याचा निर्धार केला ते नारायण आबा पाटील, उत्तमराव जानकर, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख अभिजीत पाटील, अभयसिंह जगताप, सुभाष गुळवे, संतोष वारे, सौ. सविताराजे भोसले, सुधाकर रावल, संघटनेचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, वैभवराजे जगताप, उत्तम कांबळे, शिवराज जगताप, देवानंद बागल, आप्पासाहेब, अतुल पाटील असे अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा उल्लेख मी याठिकाणी करतोय. जर काही राहिले तर त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो.
सगळ्यांच्या वतीने माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला- आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळेजण मोठ्या संख्येने याठिकाणी जमला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या वतीने माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि धैर्यशील मोहिते पाटील या तरूणाला ही संधी आपण सगळ्यांनी द्यायचा निर्णय घेतला. मला आनंद आहे की, या कामाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करमाळ्याचे अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी पाठिंबा दिला, संभाजी ब्रिगेडच्या वतीने सचिन जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब सुपनवर यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. या सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आभारी आहे. एका तरूण माणसाला भारताच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला, त्यामुळे तुम्हा लोकांचा पाठिंबा मिळतोय.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
१९७२ साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो- हा तालुका महाराष्ट्रातला एकेकाळचा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. एक काळ असा होता की, माझा इथे अधिक संबंध होता. १९७२ साली मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आणि पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मला आठवतंय की, करमाळ्यात आल्यानंतर इथले ज्येष्ठ नेते, सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नामदेवराव जगताप आणि माळशिरस तालुक्याचे नेतृत्व करणारे दुसरे ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील या सगळ्यांशी आम्हा लोकांचा सुसंवाद असायचा. मी अनेकदा याठिकाणी त्या काळात आलो आहे. इथे कृषी बाजार समिती आहे, त्यामध्ये एक लहानसं गेस्ट हाऊस होतं, नामदेवराव तिथे असायचे. त्या गेस्ट हाऊसमध्ये मी अनेकदा गेलो. जिल्ह्याच्या प्रश्नासंबंधी चर्चा केली. आणि दुष्काळाच्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं, याचा विचार आम्ही लोकांनी या तालुक्यामध्ये केला होता. तो दुष्काळ एवढा मोठा होता की, ५ लाख लोकांना रोजगार हमीचं काम देण्याचा संकल्प होता. पण या जिल्ह्यातील नेत्यांच्या मदतीने नामदेवरावजी जगताप, शंकरराव मोहिते पाटील, विठ्ठलराव शिंदे, औदुंबर आण्णा पाटील, अनेकांची नावं घेता येतील, या लोकांच्या सहकार्याने या दुष्काळाला तोंड द्यायचं काम आम्ही लोकांनी याठिकाणी केलं होतं.
गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावरांना चारा देण्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली- मला आठवतंय की, जनावराला चारा नव्हता. जनावराचा चारा म्हणजे फक्त ऊसाचं वाढं, ऊसाचं वाढं जनावरांना घालून त्यांच्या तोंडामध्ये त्रास व्हायला लागला होता. जनावरं हा चारा खात नव्हते. शेवटी आम्ही लोकांनी गुजरातमधून अमूल नावाची कृषी संस्था आहे, त्या संस्थेच्या प्रमुख लोकांना आम्ही निमंत्रण दिलं. इथली स्थिती दाखवली आणि त्यांच्याकडून गुजरातमधून इथं आम्ही चारा आणला. जनावरांच्या कॅम्पमध्ये या चाऱ्याची व्यवस्था केली. आणि त्याचवेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मी त्याची आठवण यासाठी करून देतो, गुजरातची दुधाची संस्था महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या जनावरांना चारा देण्यासाठी आम्हाला मदत त्यांनी केली. आम्ही त्यांचे आभारी होतो. आणि महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेचे जे अध्यक्ष होते, त्यांच्यावर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. काय गुन्हा केला त्यांनी…? इथल्या दुष्काळग्रस्त लोकांच्या जनावरांना चारा द्यायचं काम त्यांनी केलं. आणि ते करणाऱ्यांवर खटला भरणारे त्यावेळचे मुख्यमंत्री हे आजचे प्रधानमंत्री आहेत, असेही पवार म्हणाले.