साखर एके साखर करून चालणार नाही, नवनवीन तंत्रज्ञान वापरून उसाचे पीक वाढवावे लागणार: शरद पवार
![](https://bhaskarmarathi.com/wp-content/uploads/2024/01/ऊस-२६.jpg)
पुणे, दि. १४- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे. जवळपास १९ देशातील साखर तत्त्वज्ञान ज्ञात असलेले संशोधक तेथे उपस्थित आहेत आणि त्याबरोबरच ५ हजार लोक हे देशातून आणि देशाबाहेरून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याचे तत्व एकच आहे की साखर एके साखर करून चालणार नाही आणखीन नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला उसाचे पीक हे वाढवावे लागणार आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
जुन्नर आंबेगाव मधील श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. आसवणी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारणीकरणाचा उद्घाटन समारंभ काल संपन्न झाला. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थितांना संबोधित करत होते.
शरद पवार म्हणाले, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि इतर हितचिंतक राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, त्यांचे विचार आपण आता ऐकले ते अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब, माजी आमदार शरद सोनवणे, कृषी बाजार समितीचे अध्यक्ष संजय काळे, जिल्हा परिषदेच्या सदस्य आशाताई भोसले कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, संचालक मंडळाचे सर्व सभासद, या ठिकाणी उपस्थित असलेले अतुल शेवाळे, देवदत्त निकम आपल्या भागातील लोकप्रिय खासदार डॉ. अमोल कोल्हे, अधिकारी वर्ग विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद कामगार बंधू भगिनींनो..!
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
एका नवीन प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत. कार्यक्रमासाठी उशीर झाल्यामुळे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो एक सर्वात महत्त्वाची मीटिंग या कार्यक्रमात आधी असल्यामुळे मला उशीर झाला त्या मिटींगला तमिळनाडू, झारखंड, बिहार, दिल्ली येथील मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यासोबतच राहुल गांधी, खरगे आणि अनेक राष्ट्रीय नेते तिथे उपस्थित होते त्या बैठकीत राष्ट्रीय विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे मला तिथे उपस्थित राहावे लागले.
आसवणी व इथेनॉल याचे जे प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत ते मोठे करण्याची गरज आहे. आपण उसाचा धंदा करतो. सुरुवातीला आपण उसाचे पीक घ्यायचे त्यानंतर त्यापासून साखर तयार करायला लागलो मग साखर विक्री याला सुरुवात झाली. उसानंतर साखर आणि त्यानंतर मळीपासून अल्कोहोल आणि त्यानंतर त्यात सुधारणा करून इथेनॉल आणि त्याबरोबरच वीज तयार करण्याचे काम आणि त्याबरोबरच अजून उद्योग कसा वाढेल याचा विचार आम्ही करत आहोत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी येथे आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे. जवळपास १९ देशातील साखर तत्त्वज्ञान ज्ञात असलेले संशोधक तेथे उपस्थित आहेत आणि त्याबरोबरच ५ हजार लोक हे देशातून आणि देशाबाहेरून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याचे तत्व एकच आहे की साखर एके साखर करून चालणार नाही आणखीन नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला उसाचे पीक हे वाढवावे लागणार आहे. त्याबरोबरच उसापासून साखर तयार करण्यासाठी जो काही खर्च येतो तो कमी कसा करता येईल आणि त्यातून जी काही रक्कम मिळेल ती रक्कम सभासदांपर्यंत कशी देता येईल आणि कामगारांपर्यंत कशी पोहोचेल या उपयोजना तेथे करण्यात येणार आहेत.
साखर धंदा हा देशातील अत्यंत महत्त्वाचा धंदा आहे. दर दिवसाला ३५ हजार टन गाळ काढण्याची कॅपॅसिटी आणि आज आपण जेवढी साखर तयार करतो त्याहून चौपट साखर तिथे तयार केली जाते आणि त्या कारखान्यांमध्ये फक्त १३ सभासद होते म्हणजे १३ शेतकऱ्यांच्या जमिनीच्या उसातून ३५ हजार टन गाळ काढला जातो आणि हंगाम हा फक्त ८ महिन्यांचा अशा स्थितीत तो कारखाना चालू आहे. तिथल्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली त्यांना मी विचारलं की तुमचा ऊस किती आहे त्यावर त्यांनी सांगितलं की ११ हजार एकर आहे. पण त्या जगामध्ये खासियत अशी आहे की ते साखरही करतात आणि इथेनॉल ही करतात पण साखर जर कमी असेल तर ते इथेनॉल वर लक्ष देतात आणि इथेनॉल कमी असेल तर साखरेचे उत्पादन वाढवतात.
आपल्याकडे हे सर्व करणे शक्य नाही. आपण जमिनीसंबंधीचा इथे कायदा देखील केला किती क्षेत्र ठेवता येईल याचा कायदा आहे त्यामुळे हे साहजिकच आहे की आपण इथे जास्त जागा देऊ शकत नाही मग काय करायचं तर एकच करता येईल की या उसाची गाळप झाल्यानंतर नवीन प्रयोग काय करता येतील यासंबंधीचा विचार करून ऊस उत्पादकांना त्याचा मोबदला मिळेल यासाठी हा आसवणी व इथेनॉलचा हा आमचा प्रयत्न आहे.
आज ब्राझील सारख्या देशांमध्ये असा विचार केला जातोय की उसाची साखर करून मळीचे इथेनॉल करून आणि ते पेट्रोलमध्ये मिक्स करून जो काही पेट्रोल आयात केला जातो त्यातून कोट्यावधी खर्च रोखून ब्राझील सारख्या देशांमध्ये इंधनासाठी लागणारे फ्युएल हे तयार केले जाणार आहे. देशामध्ये सातत्याने नवनवीन होणारे बदल हे आपल्या सभासदांपर्यंत पोहोचवणे हे आपले काम आहे आणि हे काम वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जाणकारांना बोलावून सातत्याने करत असते. मला आनंद आहे की विघ्नहर सहकारी साखर कारखाना काही नवीन झाले की ते स्वीकारून दोन पैसे जास्त कसे देता येतील यावर भर देतात.
आसवणी करण्याचा जो काही तुम्ही निर्णय घेतलाय त्यासोबतच इथेनॉल प्रकल्प तुम्ही काढला आता त्याचा विस्तार करण्यासाठी जी काही नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही आत्मसात केली ती अतिशय उत्तम आहे. या देशांमधील सर्वोत्तम दोन असलेल्या टेक्नॉलॉजी या तुमच्या कारखान्यामध्ये आहे आणि त्यामुळे कारखान्याचे चेअरमन सभासद आणि सर्व पदाधिकारी यांना मी धन्यवाद देतो की, चांगल्या तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करून कारखान्याला चालना देत आहात.
नितीन गडकरी केंद्रातील मंत्री आहेत. त्यांना देशात किती साखर शिल्लक आहे, हे आम्ही त्यांना दाखवून दिलं. त्यामुळं साखर निर्यात धोरणात बदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं. गडकरी शेतकऱ्यांच्या कामात मदत करतात, समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे. हे ते पाहत नाही, मदत करण्याची त्यांची इच्छाशक्ती असते. त्यामुळे ते हा निर्णय घेऊ शकणार नसले, तरी ते केंद्रात जाऊन हा मुद्दा नक्कीच मांडतील.
२००४ मध्ये मंत्रिमंडळांमधून प्रणव मुखर्जी आणि मनमोहन सिंग हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारले की कोणते खाते तुम्हाला पाहिजे त्यांनी माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला की अर्थ खाते गृह खाते संरक्षण खाते की आणखीन कोणतं त्यावर मी सांगितलं की मला शेती खाते हवे आहेत त्यांना आश्चर्य वाटले कारण सहसा शेती खाते कोणी मागत नाही अर्थ खाते गृह खाते अशी खाती मागितली जातात पण ते सोडून तुम्ही शेती खाते मागत आहात त्यावर मी त्यांना एकच सांगितलं की या देशातील ५६% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत आणि त्या लोकांचे संसार सांभाळायला मला हातभार लावता आला त्यातच माझा आनंद आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४०% कर लादला. मी मंत्री असताना सभागृहात एकदा कांद्याच्या माळा विरोधी पक्षातले नेते घालून आलेत कांदा महाग झाला असे ते बोलत होते आणि त्यामुळे तो परदेशात पाठवू नका असे त्यांचे म्हणणे होते त्याची किंमत कमी करा मी त्यांना विचारलं की तुमच्या रोजच्या जेवणामध्ये कांद्याचा खर्च किती असतो ? तुम्ही भात भाकरी चपाती भाजी आमटी या सर्वाला जो काही खर्च येत असेल त्यातला कांद्याचा खर्च किती रोजच्या जेवणाचा एकंदर विचार केला तर, ५% हून कमी खर्च हा कांद्याचा असतो आणि त्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तर यात काय चुकले. मी पार्लमेंट मध्ये सांगितलं तुम्ही काहीही करा तरी मी कांदा निर्यात थांबवणार नाही. शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर त्यात मी निर्यात बंदी थांबवू शकत नाही आणि त्या प्रकारचे धोरण त्या काळात मी राबवले.
साखर, कांदा, कापूस याबाबत निर्यातीच्या धोरणांमध्ये एक प्रकारचे सातत्यात पाहिजे. आता इथेनॉल किती करायचं आणि कशापासून करायचं यासंबंधीचा केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यावर बंधने टाकली. तुम्हीच कारखाना उभा करणार आणि त्यात किती माल तयार करायचा आणि कसा तयार करायचा हे सरकार ठरवणार.
चार वर्षांपूर्वी पंजाब, राजस्थानसह काही राज्यातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. त्यांनी १ वर्ष दिल्लीचा प्रवेशद्वार रोखला होता. सरकारच्या शेती धोरणाविरोधात आवाज उठवला, मग सरकारला नमावं लागलं. आपण सगळे एक आहोत, आपलं राजकारण हे शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण आहे आणि ते करण्यासाठी आपली एकजूट असली पाहिजे.
काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत येऊन गेले त्यांनी भाषणामध्ये सांगितले की, घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली ? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं.
अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. राम या देशातील जनतेचा आस्थेचा विषय आहे या देशात फार मोठा वर्ग असा आहे की जो रामाची भक्ती करतो त्याचा आधार अनादर कोणी करू नये, मात्र २२ जानेवारीला नाही जाणार, नंतर नक्की जाणार, श्रीराम हे सर्वांचे आहेत.
अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. १० हजारांचे तिकीट ४० हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाहीतर, त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणं चुकीचं राहील. अनेक वेळेला नाही त्या प्रश्नावर आपण जास्त लक्ष केंद्रित करतो. राम मंदिराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचं काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील.
राज्य सरकारमध्ये एका कामासाठी २ हजार मुलांना नेमायचे होते परंतु अर्ज हे दीड लाख आलेत; २ हजार जागेंसाठी दीड लाख अर्ज यातूनच देशातील बेरोजगारी ही प्रकर्षाने दिसून येते आणि या अशा अनेक प्रश्नांमध्ये लक्ष देण्यासंबंधीची भूमिका न देता भलत्याच ठिकाणी लक्ष देण्याचे काम हे सरकारकडून चालू आहे.
जनतेच्या समोर महागाई, बेरोजगारी यांसारखे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत अनेक कामे अशी आहेत की त्यासाठी सामूहिक शक्ती वापरली गेली पाहिजे आणि आपण सर्वांनी एका विचाराने कामांमध्ये साथ दिली पाहिजे हीच माझ्यासारख्याची अपेक्षा आहे. या कारखान्यांमध्ये जे काही काम चालू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो हा विस्तारीकरणाचा जो प्रकल्प आहे हा तुम्हाला मी अर्पण करतो, असेही शरद पवार म्हणाले.