सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीतूनच काढा, अन्यथा मराठ्यांचा जनसागर उद्या आझाद मैदानावर धडकणार ! मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला अल्टिमेटम !!
मुंबई, दि. २६ : सगेसोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीतून काढा, अन्यथा उद्या मी आझाद मैदाणावर धडकणार असा अल्टिमेटम मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज, २६ जानेवारी रोजी राज्य सरकारला दिला. अंतरवाली सराटीतून निघालेलं मराठ्यांच वादळ हे मुंबईच्या वेशीवर धडकलेलं आहे. यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आलं व घाईघाईने सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं. राज्य सरकारने ५ ते ६ अध्यादेश मनोज जरांगे यांना दिले. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील अनेक महत्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे या अध्यादेशासाठी ठाम आहेत. यावर राज्य सरकारचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितले की हा अध्यादेश तयार होत आहे. यावर सर्वाच्या स्वाक्षर्याही झाल्या मात्र पुढील प्रक्रिया लवकरच होईल. तत्पूर्वी तुम्ही आंदोलन मागे घ्या, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने सचिवाने केली मात्र, मनोज जरांगे पाटील अध्यादेश काढण्यावर ठाम होते. आज रात्रभर आम्ही ईथेच थांबतो. तुम्ही रात्रीतून अध्यादेश काढा आम्ही माघारी फिरतो परंतू अध्यादेश काढला नाही तर उद्या आझाद मैदानावर धडकणार, असंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं.
वाशी येथे जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सकाळी शासनाच्या वतीनं चर्चा झाली. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यासाठी आपण सर्व मुंबईपर्यंत आलो आहोत. कुठं जायंच अन् कुठं नाही हे गनिमी कावे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. सरकारचे मंत्रिमहोदय मात्र आले नव्हते. सचिव सुमंत भांगे आले होते. चर्चेचा सारासार निर्णय घेवून आपल्यापर्यंत आले होते. त्यांचे निर्णय आपल्याला सांगितले. ५४ लाख नोंदी जर खरच सापडल्या तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ५४ लाखांच्या नोंदीचे कागद ग्रामपंचायतला चिटकवले पाहिजे. ५४ नोंदी प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी गावागावांत शिबिरं सुरु केले. ग्रामपंचायतमध्ये मिळालेल्या नोंदी चिटकावयला सुरुवात केली. ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी मिळालेल्या सगळ्या परिवाराला त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावं. एका नोंदीवर १७० लोकांना फायदा मिळाल्याचं मला एका मराठा बांधवानं सांगितल्याचा उल्लेखही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. एका नोंदीमागे आपण परिवारातील ५ जण जरी गृहीत धरले तर महाराष्ट्रातील आरक्षणाची संख्या अडीच कोटीवर जाते. एवढं लक्षात ठेवा.
सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की ५४ लाख नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरु आहे. नोंद मिळालेल्या परिवारातील सदस्यांनी अर्ज करणे गरजेचं आहे. आपण अर्जच केला नाही तर आपल्याला प्रमाणपत्र कसं मिळणार ? सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे सांगत आहेत की ५७ लाख नोंदी मिळाल्या. मराठ्यांच्या दणक्याने या नोंदी वाढल्याचं दिसतं, असंही जरांगे पाटील म्हणाले. ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाल्याचंही सचिवांनी सांगितलं. यादी घेतली मी त्यांच्याकडून सर्वांना व्हॉट्सअप करतो. ज्या लोकांना प्रमापत्र दिलं त्यांचा डाटा आपण सरकारकडे मागितला आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
शिंदे समिती ही रद्द करू नका. या समितीने काम करीत रहायचं. समितीला एक वर्ष मुदत वाढ द्या, अशी आपण मागणी केली आहे. सरकारने मात्र दोन महिन्यांची मुदत वाढ दिली आहे. ज्यांची नोंद मिळाली त्याच्या गणगोतालाही प्रमाणपत्र द्यावं, त्याचा शासननिर्णय काढावा. ज्या बांधवाकडे नोंदी सापडल्या नाही. त्याने नोंद सापडलेला व्यक्ती हा माझा पाहुणा आहे असं शपथपत्र द्यायचं. त्या शपथपत्रावर लगेच प्रमाणपत्र द्यावं. अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.
शंभर टक्के मोफत शिक्षण द्या, मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका- मनोज जरांगे
जर एखादा मराठा आरक्षणाच्या दोन्ही निकषात बसला नाही किंवा नोंदी जुळल्या नाही अशा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्यात यावं. ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहातत त्या सरकारी भरत्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत. जर तुम्हाला सरकारी भरती करायची असलीच तर आमच्या जागा राखीव ठेवून भरती करावी.
लोकं म्हणत्याल आरक्षण मिळत नाही मग हे काय आहे ? मनोज जरांगे पाटील
लोकं म्हणत्यात आरक्षण मिळत नाही. आतापर्यंत ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्याचं राज्य सरकारचे सचिव सुमंत भांगे यांनी आत्ताच मला सांगितलं. मग हे काय आहे? नोंदी सापडलेल्या ५७ लाख लोकांच्या परिवारातील ५ जण जोडले गेले तर महाराष्ट्रात एकूण अडीच कोटी मराठे आरक्षणाच्या चौकटीत येतील, असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठवाड्यात ४० हजार नोंदी सापडल्या आहेत. सग्यासोयर्यामुळं अख्खा मराठा समाज आरक्षणाच्या चौकटीत येणार आहे. हैदराबादचं गॅझेट लागू करा यामुळे मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेण्यास पात्र होईल. सग्यासोयर्याचं अध्यादेश निघाल्यानंतर महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणाच्या बाहेर राहणार नाही. राज्य सरकारचे सचिव सुमंत भांगे यांना माझी एवढी विनंती आहे की, मुंबईला याचची आम्हाला हौस नाही. आम्ही कष्टकरी लोकं आहोत. तुम्ही आज, आजच्या रात्री हा अध्यादेश आम्हाला द्यावा, अशी विनंतीही मनोज जरांगे पाटलांनी जाहीर सभेत केली.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून शनिवार 20 जानेवारी रोजी सकाळी मुंबईकडे कूच केली होती. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेवून आपली भूमीका स्पष्ट केली. तब्बल सात महिने वाट पाहूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून ठरल्याप्रमाणे मुंबईत जाऊन आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा करून जरांगे पाटल मुंबईकडे मजल दरमजल करत निघाले होते.
दरम्यान, आज २६ जानेवारीला सकाळीच मनोज जरांगे पाटील आणि कोट्यवधी मराठ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकला. वाशीत जरांगे पाटील असतानाच राज्य सरकार अलर्ट मोडवर आले. तातडीने राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ५ ते ६ अध्यादेश काढले. सदर अध्यादेश घेवून राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले व वाशीतूनच मोर्चाची माघार घ्यावी अशी विनंती जरांगे पाटील यांना केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
दरम्यान, सरकारचे अध्यादेश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा सहकार्यासोबत व वकीलांच्या तज्ञ टीमसोबत चर्चा केली. मनोज जरांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचा दावाही राज्य सरकारने केला. वाशीमध्येच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत वाटाघाटी सुरु होत्या. वाशीमधूनच आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही मनोज जरांगे पाटील यांना करण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. आज जे अध्यादेश मला देण्यात आले. त्याचा मी रात्रीतून अभ्यास करतो. याशिवाय वकीलाची तज्ञ टीमही या अध्यादेशाचा अभ्यास करणार आहे. मात्र, जोपर्यंत सगेसोयरांचा अध्यादेश काढत नाही तोपर्यंत माघार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितलं. आज रात्रीतून हा अध्यादेश काढा अन्यथा कोट्यवधी मराठ्यांचा जनसागर उद्या मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.