ताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील ३२ विमानतळांवर युद्धपातळीने विकासकामे करण्याचे निर्देश ! नांदेड, धाराशिव, लातूर, चीपी, शिर्डी विमानतळ कामांचाही आढावा !!

मुंबई, दि. २४- राज्यातील एकूण 32 विमानतळांपैकी अनेक विमानतळांवर विकास कामे सुरू आहेत. कालबद्ध कार्यक्रम राबवून ही कामे पूर्ण करावी, असे निर्देश देत गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

महाराष्ट्रातील विमानतळांच्या विकासाची कामे वेगाने व्हावी यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, पुरंदर, गोंदिया, गडचिरोलीसह अन्य विमानतळ विकास कामांचा समग्र आढावा घेतला.

सोलापूर येथील बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) व राज्य शासन यांच्यामध्ये विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करण्याचे निर्देश दिले. होटगी विमानतळ विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा व कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आवश्यक भूमी अधिग्रहण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिली.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

पुरंदर विमानतळासाठी पुन्हा-पुन्हा भूसंपादन करण्याची गरज पडू नये यासाठी अधिग्रहणाचा योग्य आराखडा तयार करण्याची सूचना देखील दिली. यासोबतच छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याची सूचना केली, त्यासाठी ₹600 कोटी लागणार आहेत.

अमरावती विमानतळावर सुरू असलेली ‘नाईट लँडिंग’ सुविधांची कामे मार्चपर्यंत पूर्ण करून सुविधा सुरू करण्याची व अकोला विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी अंतिम निर्णय घेवून या कामाला गती देण्याच्या सूचना देखील दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात मोरवा विमानतळाच्या आजूबाजूला उपलब्ध जागेत धावपट्टी वाढविण्याचे, धुळे येथील विमानतळाची धावपट्टी व कराड विमानतळासाठी भूसंपादन पूर्ण करण्याचे तसेच विमानतळ विकासासाठी असलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देशही यावेळी दिले.

यावेळी जळगाव, गोंदिया, बारामती, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, लातूर, चीपी, शिर्डी येथील विमानतळ कामांचाही आढावा घेतला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!