पेरण्या सुरु होण्याआधी पीक कर्ज, बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश !
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला खरीप हंगाम पूर्व आढावा
- ६ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.29 :-खरीपाच्या पेरण्या सुरु होण्याआधी शेतकऱ्यांना पीक कर्ज, बियाणे व खतांचा पुरवठा झाला पाहिजे या पद्धतीने सर्व नियोजन करावे. शेतकऱ्यांना पिक विमा साक्षर केले पाहिजे तसेच वेळेत पीक कर्ज उपलब्धता करण्यासाठी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ मोहिम राबवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात ६ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीसाठी नियोजन आज सादर करण्यात आले. त्यात सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजेच ३ लाख ९५ हजार ५५ हेक्टरवर कापूस तर १ लाख ७२ हजार १५३ हेक्टर क्षेत्रावर मका या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे, खते, किटकनाशके यांच्या उपलब्धताही पुरेशी असल्याचे नियोजन यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सादर केले.
जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम २०२४ पूर्व आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच अन्य विभागप्रमुख, विमा कंपनी प्रतिनिधी, खते- बियाणे, किटकनाशके विक्रेत्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
३९ हजार २६४ क्विंटल बियाण्याची आवश्यकता
जिल्ह्यात एकूण ६ लाख ४५ हजार ४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वाधिक क्षेत्र कपाशीसाठी ३ लाख ९५ हजार ५५ हेक्टर इतके आहे. त्यानंतर मका या पिकासाठी १ लाख ७२ हजार १५३ हेक्टर आहे, तूर पिकासाठी ३७ हजार ९८५ हेक्टर, बाजरीसाठी १८ हजार ४५७ हेक्टर या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच संकरीत ज्वारी, मुग, उडीद, भुईमूग, सूर्यफुल, तीळ या पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पिकांच्या लागवडीसाठी ३९ हजार २६४ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून त्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.
२ लाख ८८ हजार मे.टन खतांचे आवंटन उपलब्ध
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ३ लाख २० हजार २६३ मे. टन खतांची मागणी असून २ लाख ८८ हजार ७०० मे.टन खतांचे आवंटन मंजूर आहे. त गतवर्षीचा शिल्लक साठा १ लाख २ हजार ५२१ मे. टन इतका आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गुणनियंत्रणासाठी सज्जता
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यात १० भरारी पथके तयार करण्यात आले आहेत. तर ३० गुणनियंत्रण निरीक्षक नियुक्त आहेत. जिल्ह्यात बियाणे, खते, किटकनाशके इ. निविष्ठा विक्रेत्यांची संख्या ६५५७ इतकी आहे. यांच्याद्वारे शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे इ. निविष्ठांचा पुरवठा केला जाईल,असे सांगण्यात आले.
घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्याचा सल्ला
कापूस आणि सोयबीन पिकासाठी बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. जिल्ह्यात कापूस पिकाच्या नियोजित क्षेत्रावर पेरणीसाठी बियाण्यांची २० लाख ८४ हजार पाकिटे लागणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना घरचे बियाणे तयार करण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी २५ हजार ५३९ क्विंटल बियाणे तयार ठेवले आहे,अशी माहिती देण्यात आली. यासोबतच पिककर्ज वाटप, पीक विमा नियोजन इ.बाबतचे नियोजनही सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांना पीकविमा साक्षर बनवा- जिल्हाधिकारी स्वामी
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शेतकऱ्यांना पीकविमा साक्षर करण्यासाठी विशेष मोहिम राबविली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठीही विशेष मोहिम राबवा. ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’, असे अभियान राबवा. स्थानिक बॅंकशाखा, कृषी विभागाचे कर्मचारी यांनी मिळून शेतकऱ्यांच्या गावात पीक कर्ज मेळावे घ्या. तेथेच त्यांचे कर्ज प्रकरण मार्गी लावा. पेरणी सुरु करण्याआधी पीक कर्ज, बियाणे आणि खते शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
आपत्कालिन नियोजनाची आवश्यकता
ते म्हणाले की, एकंदर हवामानाचे बदलते स्वरुप पाहता एक आपत्कालिन नियोजनही तयार केले पाहिजे. पावसाने अधिक ओढ दिली तर काय करायचे, किंवा पावसाचे दिवस कमी होऊन जादा पाऊस झाला तरी काय करावे, हे नियोजन तयार करायला हवे, असे त्यांनी सांगितले.
वितरणापूर्वीच गुणनियंत्रण करा- विकास मीना
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर पंचनामे करुन बियाणे नमुने तपासण्यापेक्षा बियाणे पुरवठादारांकडील साठे तपासा, तेव्हाच त्याची गुणवत्ता तपासा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार बंद होतील. वेळेवर नमुने घेऊन बियाणे गुणनियंत्रण करावे,असे निर्देश मीना यांनी दिले.शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्र पोहोचविण्यासाठी क्षेत्रिय कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय हवा. जमिनीची उत्पादकता वाढविणे व त्यातून चांगले उत्पन्न वाढवावे,असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले कृषी अधिकारी साहेबराव जेधे यांनी आभार प्रदर्शन तर संजीव साठे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.