गारखेडा परिसरात दोन दिवस आपत्कालीन भारनियमन ! पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवल्याने वीजपुरवठा सुरळीत, ग्राहकांना दिलासा !!
छत्रपती संभाजीनगर : एन-४ उपकेंद्रातील नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर महावितरणच्या चमूने युद्धपातळीवर अथक परिश्रम करून गुरुवारी (१८ एप्रिल) बसवला. यामुळे दोन दिवस आपत्कालीन भारनियमनाला सामोरे जावे लागलेल्या गारखेडा परिसरातील ग्राहकांना दिलासा मिळून त्यांना सुरळीत वीजपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान दोन दिवस झालेल्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच सहकार्याबद्दल ग्राहकांचे आभार मानले आहेत.
एन-४ येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर काही दिवसांपूर्वी नादुरुस्त झाला होते. हे ट्रान्सफॉर्मर एजन्सीला दुरुस्तीसाठी देऊन त्याजागी तात्पुरता पर्याय ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला. तसेच त्यावरील ११ केव्ही गारखेडा वाहिनीचा भार ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रावर वळविण्यात आला. परंतु उष्णतेमुळे अचानक वीज मागणी वाढली आणि ३३ केव्ही सूतगिरणी उपकेंद्रामधील १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर अतिभारित झाल्याने काही वाहिन्यांवरील ग्राहकांना दोन दिवस आपत्कालीन भारनियमनाला सामोरे जावे लागले.
यावर सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता व मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली एजन्सीला आदेश देऊन युद्धपातळीवर १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करण्यात आला. गुरुवारी सकाळी शेंद्रा येथील एजन्सीच्या साईटवरून पहाटे ४ वाजता ट्रान्सफॉर्मर उचलून सकाळी ६ वाजता उपकेंद्रात आणला. महावितरणच्या चमूने सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अथक परिश्रम घेऊन ट्रान्सफॉर्मर बसवला. आधी ५ एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर काढून त्यावर १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर काळजीपूर्वक बसवणे हे जिकिरीचे काम होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
ऑइलसह जवळपास १५ टन वजनाचे महाकाय ट्रान्सफॉर्मर उचलण्यासाठी दोन क्रेन लागल्या. संध्याकाळी ६ वाजता महावितरणच्या चमूने मोहीम फत्ते केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. या कामासाठी अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी, कार्यकारी अभियंता महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश आंबेकर, प्रकाश तौर, सहायक अभियंता काथार तसेच चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशपांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता राठोड, सहायक अभियंता विनोद शेवणकर यांच्यासह महावितरणचे कर्मचारी दिवसभर उपकेंद्रात तळ ठोकून होते.