महानगरपालिकेतील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, सबंधित सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस !
छत्रपती संभाजीनगर, दि.२३ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालय क्रमांक ८ व ४ येथील कर्मचारी यांनी ६०० स्वे.फूट घराला कर लावण्यासाठी लाच मागितल्याची बातमी प्रसिध्द होताच गंभीर दखल घेऊन आज आयुक्त जी श्रीकांत यांनी कर वसुली आढावा बैठक घेतली. या बैठकीत सबंधित दोन कर्मचारी अनुक्रमे कंत्राटी अभियंता प्रेमनाथ मोरवाल व मनपा आस्थापना वरील वसुली कर्मचारी या पदावरील साईनाथ राठोड यांना तत्काळ निलंबित करण्याचे तसेच संबधितांवर कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
यासोबतच त्यांनी सबंधित प्रशासकीय कार्यालय सहायक आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच सर्व सहायक आयुक्त यांना आपल्या कार्यालयातील असे लाचखोर कर्मचारी शोधणे व त्यांची पूर्ण माहिती घेण्याचे निर्देश दिले. या दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे व जाहीर प्रगटन प्रसिद्धीचा खर्च सबंधित कर्मचारी यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले.
यावेळी त्यांनी नवीन मालमत्ता किती शोधण्यात आल्या व किती मालमत्तांना कर लावण्यात आला याचा सविस्तर आढावा घेतला. महानगर पालिका आत्मनिर्भर होण्यासाठी कर वसुली महत्वाची आहे त्यामुळे कर वसुलीत कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच कोणत्याही मालमत्तेला कर लावण्यासाठी पैसे मागितले तर ते खपवून घेतले जाणार नाही अशी स्पष्ट ताकीद त्यांनी यावेळी दिली. या बैठकीला उप आयुक्त अपर्णा थेटे, सर्व सहायक आयुक्त यांची उपस्थिती होती.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe