शरद पवारांना मोठा धक्का: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे ! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने महाराष्ट्रात राजकीय भूकंप !!
मुंबई, दि. ६ – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतील उभ्या फुटीनंतर निवडणूक आयोगाकडे सुरु असलेल्या याचिकेवर आज निर्णय आला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार गटाला उद्यापर्यंत नवे नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून अजित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सामिल होवून शरद पवार यांना मोठा धक्का दिला होता. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांचा एक मोठा गट घेवून उद्धव ठाकरे यांना धक्का देत भाजपासोबत सत्ता स्थापन केली होती. अगदी त्याच पद्धतीने अजित पवार गटाने शरद पवार यांना धक्का देत राज्य सरकारमध्ये सामिल झाले होते.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे असल्याचा निर्णय नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे. अगदी त्याच धर्तीवर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर काहीचा असाच निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचे असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. विधीमंडळ सदस्यांचे बहुमताला निवडणूक आयोगाने महत्त्वाचे स्थान दिले असून हा बहुमताचा आकडा अजित पवार गटाकडे असल्याचे निकालात म्हटले आहे.
विधीमंडळ सदस्यांचे बहुमत आणि पक्षातील लोकशाही या दोन मुद्यांवर आधारीत हा निर्णय दिला आहे. ४१ विधीमंडळ सदस्य हे अजित पवार गटाकडे असल्याने पार्टीचा निर्णय त्यांच्या बाजुने देण्यात आला आहे. या तुलनेत शरद पवार गटाकडे केवळ १५ विधीमंडळ सदस्य आहे.