ताज्या बातम्यामराठवाडा

जालना जळगाव महामार्गावर लिंबाच्या झाडाखाली शाळा भरवल्याप्रकरणी गुन्हा, लहान विद्यार्थ्यांना क्रुझरमध्ये बसवले ! भोकरदन पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांची पोलिसांत धाव !!

छत्रपती संभाजीनगर -: मुख्याध्यापकांची परवानगी न घेता शाळेच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना खाजगी क्रुझर गाडयामध्ये बसवून जालना जळगांव महामार्गावर बरंजळा पाटी येथे एका लिंबाच्या झाडाखाली शाळा भरवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात लहान विद्यार्थ्यांना बेकायदेशीर जमवल्याचे भोगरदन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दिलीप सखाराम शहागडकर (गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती भोकरदन, रा. माहोरा ता. जाफराबाद, जि.जालना) यांनी पोलिसांत दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, ते भोकरदन येथे मागील दोन वर्षांपासून भोकरदन पंचायत समिती येथे गटशिक्षण अधिकारी म्हणून नेमणुकीस आहे. बरंजळा लोखंडे (ता. भोकरदन) येथील नारायण रमेशराव लोखंडे यांनी मुख्याधिकारी, जालना व भोकरदन पंचायत समितीस पत्र देवून कळविले की, दिनांक 16/01/2024 रोजी जिल्हयातील 1000 विदयार्थी यांना सोबत घेवून जिल्हा भरातील वेगवेगळ्या महामार्गावर शाळा भरवून शिक्षक मागणी करण्यात येणार आहे. या आशयाचे निवेदन दिले होते.

आंदोलनकर्ते नारायन रमेशराव लोखंडे यांना गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी समजावून सांगितले की, तुम्ही लहान विद्यार्थी मुलांना सदर आंदोलनात सहभागी केल्यास त्यांना मानसीक तसेच शारीरिक त्रास होवून त्यांचे शैक्षणीक नुकसान होवू शकते. तसेच तुमच्या मागण्या असलेली बाब ही, पंचायत समिती, जिल्हा परीषद, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विभागीय आयुक्त कार्यालय यांचे अख्यात्यारीतील नसून सदर बाब ही शासन स्तरावरील असून सदर आंदोलन न करण्याबाबत लेखी पत्र दिले असता त्यांनी पत्र घेण्यास नकार दिला. तुम्ही जर अशा प्रकारे बेकायदेशीर आंदोलन करत असाल तर तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी त्यांना कळवले होते.

भास्कर मराठीचे गुगल अॅप डाऊनलोड करा अन् रहा अपडेट.

त्यानंतर दिनांक 16/01/2023 रोजी 11.30 वा ते 15.00 वाजेच्या दरम्यान आंदोलनकर्ते नारायन रमेशवराव लोखंडे व इतर चार ते पाच अनोळखी लोकांनी जालना जळगांव महामार्गावर बरंजळा पाटी येथे जि.प.शाळा बरंजळा लोखंडे, सिरसगांव वा. व सावखेडा येथील शाळेतील लहान विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांची परवानगी न घेता शाळेच्या वेळेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी क्रुझर गाडयामध्ये बसवून जालना जळगांव महामार्गावर बरंजळा पाटी येथे एका लिंबाच्या झाडाखाली जमा केले. त्या ठिकाणी घोषणाबाजी करून त्या ठिकाणी शाळा भरवली. सदर ठिकाणी एकूण 26 शाळकरी लहान विद्यार्थ्यांना बेकायदेशीर आंदोलनात सहभागी करून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंदोलनकर्ते नारायन रमेशराव लोखंडे यांच्यासह अन्य एका जणावर भोकरदन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!