अजिंठा अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी : 5408 ठेविदारांचे 148 कोटी DICGC कडून मंजूर, लवकरच खात्यावर जमा होणार !
बँकेचे तत्कालीन प्रशासक सुरेश काकडे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, घोटाळेबाज सुभाष झांबड अद्याप फरार
छत्रपती संभाजीनगर, दि. २८- अजिंठा अर्बन को.ऑप. बॅंकेतील ठेवीदारांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ५ हजार ४०८ ठेविदारांचे १४८ कोटींचे क्लेम DICGC ने मंजूर केले असून ३१ मार्चपर्यंत कोणत्याही क्षणी या ठेविदारांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. RBI ने निर्बंध घातल्यानंतर अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेचे तत्कालीन प्रशासक सुरेश काकडे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सुमारे साडेपाच हजार ठेवीदारांच्या जीवात जीव आला आहे. क्लेम जमा होण्यास प्रचंड उशीर झाल्याने ठेवीदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बॅंकेवर प्रशासक म्हणून मुकेश बारहाते म्हणून काम पाहात असून सूत्रे हातात घेतल्यापासून त्यांनीही चांगला पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
आतापर्यंत एकूण सुमारे २०० कोटींचे क्लेम मजूर झाले आहेत. ७ कोटी, ४८ कोटी आणि आता ५ हजार ४०८ ठेवीदारांचे १४८ कोटींचे क्लेम टप्प्याटप्प्याने मंजूर झाले आहेत. आतापर्यंत जवळपास ७० टक्के पर्यंत क्लेम मंजूर झाल्याची माहिती सूत्राने दिली. दरम्यान, काल २७ मार्ज रोजी मंजूर झालेले १४८ कोटी खातेधारकांच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा अर्बन को-ऑप. बँकेवर भारतीय रिझर्व बँकेच्या दि.28.08.2023 च्या आदेशान्वये दि. 29.08.2023 पासून सर्व प्रकारचे निर्बंध घालण्यात त्यानंतर या बॅंकेवर प्रशासक म्हणून सुरेश काकडे यांची नियुक्ती करण्यात आली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
बँकेच्या सर्व ठेवींदारांचे क्लेम (ठेव रक्कम परत मिळण्यासाठी सादर करावयाचा अहवाल) बँकेने विहित कालावधीत म्हणजेच दि. 13.10.2023 रोजी DICGC कडे सादर केला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे वेळ लागला. प्रशासक सुरेश काकडे आणि DICGC यांच्यामध्ये योग्य व अधिकृत क्लेम्ससाठी पाठपुरावा सुरु होता. मात्र, बॅंकेच्या व्यवस्थापकाच्या तुघलकी कारभारामुळे क्लेम येण्यास उशीर झाला व होत आहे. असे असले तरी ५ लाखांपर्यच्या सर्व ठेवीं सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबरला ५२ खातेदारांना मिळाली क्लेमची रक्कम आता १४८ कोटी
पहिल्या टप्प्यात ५२ ठेवीदारांचा क्लेम मंजूर करण्यात आला असल्याचा ईमेल Reserve Bank of India ने अजिंठा अर्बन को. ऑप. बँकेला दि. २३ नोव्हेंबर रोजी पाठवला आहे. ज्या ठेवीदाराची क्लेम रक्कम ९२ हजार रुपयांच्या आत आहे अशा ५२ ठेवीदारांचा क्लेम पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर ७ कोटी, ४८ कोटी आणि आता ५ हजार ४०८ ठेवीदारांचे १४८ कोटींचे क्लेम टप्प्याटप्प्याने मंजूर झाले आहेत.
२७ मार्च २०२४ रोजी १४८ कोटींचे क्लेम मंजूर- काल २७ मार्च रोजी बॅंकेला DICGC कडून अधिकृत कळवण्यात आले की, 5408 ठेविदारांचे 148 कोटी मंजूर करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मंजूर झालेल्या ठेवीदारांच्या बॅंक अकाउंटवर रक्कम जमा होणार आहे. यादी पाहण्यासाठी ठेवीदारांनी बॅंकेत गर्दी करू नये. नियमाप्रमाणे योग्य व अधिकृत क्लेम मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्राने दिली.
दोन महिन्यांच्या आत DICGC ला क्लेमची रक्कम देणे बंधनकारक मात्र प्रचंड उशीर- बॅंकेकडून खातेदारांची दावा यादी मिळाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत प्रत्येक ठेवीदाराच्या दाव्याची जास्तीत जास्त ५ लाख रुपयांपर्यंत देण्यास DICGC जबाबदार आहे. योग्य व अधिकृत प्रत्येक विमाधारक ठेवीदाराला त्यांच्या दाव्याच्या रकमेशी संबंधित दाव्याची रक्कम (जास्तीत जास्त ५ लाख रुपये) वितरित करणे DICGCला बंधनकारक आहे. यानुसार बँकेने विहित कालावधीत म्हणजेच दि. 13.10.2023 रोजी DICGC कडे क्लेम दाखल केलेला आहे. यानुसार दि. 12.12.2023 रोजी दोन महिने पूर्ण झाले. अर्थात या बॅंकेच्या खातेदारांची क्लेम यादी मोठ्या प्रमाणात असल्याने व्हेरिफिकेशनसाठी जास्त कालावधी लागत असून बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकांच्या तुघलकी कारभारामुळे उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे ठेवीदारांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रथम माहिती अहवालानुसार ९७.४१ कोटींचा घोटाळा- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक मर्यादित औरंगाबाद चे 1) सुभाष मानकचंद झांबड, (चेअरमन), 2) प्रदीप एकनाथ कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), 3) सतीश मोहरे (सनदी लेखापाल), आणि दिनांक 01/03/2006 रोजी 10.30ते दिनांक 30/08/2023 रोजी 5.30 या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकरी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज दिले. तसेच खोट्या व बनावट नोंदी घेवून खोटा हिशेब तयार करून बँकेची सुमारे 97.41 कोटी रूपये रक्कमेचा अपहार करून आर्थिक फसवणुक केली असल्याचे सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. बँकेचे संचालक मंडळ, व बँकेचे इतर जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगणमत करून ३६ कर्जदारांना विनातरण कर्ज वाटप केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्जाचे वाटप- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे (वर्ग-1, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झालेला आहे. अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा महाघोटाळा काकडे यांनी उघडकीस आणला आहे. असुरक्षित, खोट्या तथा बनावट FD दाखवून ३६ जणांना कर्ज वाटप केल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. चेअरमन सुभाष झाबंड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें यांच्यासह त्या काळातील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून हा घोटाळा केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीईओ प्रदीप कुलकर्णी, सीए सतीश मोहरें या दोघांना सुरुवातीला अटक केलेली आहे. त्यानंतर उस्मानपुरा, जाधवमंडी येथील दोन शाखा व्यवस्थापकासह तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील मुख्य सूत्रधार चेअरमन सुभाष झांबड हे अद्याप फरार आहेत.
असुरक्षित कर्जदारांच्या KYCचा शोध सुरु- अजिंठा अर्बन को.ऑप. बँकेतील ९७.४१ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अॅक्शन मोडवर काम करत असून पोलिसांनी बॅंकेतील संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 36 कर्जधारकांना असुरक्षित कर्ज वाटप करण्यात आले असून यातील काही कर्जदारांच्या केवायसीच पोलिसांना मिळाल्या नसल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. कर्जदारांच्या या फाईलीचे संपूर्ण रेकॉर्ड मिळत नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. असुरक्षित कर्जदारांची KYC सदर्भातील संपूर्ण माहिती पोलिस शोधत आहे.
५ लाखांपेक्षा ज्यास्त ठेवीची रक्कम मिळण्याची अशी असेल प्रोसेस- ५ लाखापर्यंतचे सर्व क्लेम केल्यानंतर बँक कर्जदारांकडील रिकव्हरीची प्रोसेस सुरू आहे. म्हणजे ज्या कर्जदारांकडे थकीत असलेल्या कर्जाची रक्कम वसुल करणार. रिकवरीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा DICGC कडून जी क्लेम स्वरूपात रक्कम घेऊ ती रक्कम DICGCला परत केल्यानंतर उर्वरित जी रक्कम शिल्लक राहणार आहे त्या पाच लाखांच्या वरील ठेवीदारांना परत केल्या जातील.
बॅंकेत एकूण 47 हजार अकाउंट, ३५० कोटींच्या ठेवी- साधारणत: प्राथमिक स्वरूपामध्ये 47 हजार अकाउंट आहेत. ३५० कोटी पर्यंतच्या एकूण ठेवी आहेत. ज्या तारखेला एआयडी लागलेला आहे. त्या तारखेची ही परिस्थीती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट मुदत ठेवी पुन:गुंतवणूक या सगळ्या प्रकारच्या ठेविचा त्यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, तत्कालीन प्रशासक सुरेश काकडे यांनी चांगला पाठपुरावा केल्याने आजपर्यंत सुमारे साडेपाच हजार ठेवीदारांच्या ठेवी DICGC कडून मंजूर झाल्या आहेत. काकडे यांच्यानंतर या बॅंकेवर प्रशासक म्हणून मुकेश बारहाते म्हणून काम पाहात आहे.