प्रेमसंबंधातून सिल्लोड तालुक्यातील युवकाचा खून ! युवकाने इशारा करताच अल्पवयीन मुलगी भेटायला गेली, काकाने पाठलाग करून डोक्यात दगड घालून मृतदेह विहिरीत फेकला !!
![](https://bhaskarmarathi.com/wp-content/uploads/2024/02/सिल्लोड-तालुका-खून-२.jpg)
छत्रपती संभाजीनगर, दि. ७ : प्रेमसंबंधातून सिल्लोड तालुक्यातील युवकाचा खून करण्यात आला. युवकाने इशारा करताच अल्पवयीन मुलगी भेटायला गेली. मुलीच्या काकाने त्यांचा पाठलाग केला. दोघे शेताच्या कोपर्यात दिसताच काकाला राग अनावर झाला आणि त्याने युवकाच्या डोक्यात दगड घालून खून केला. खुनाचा गुन्हा उघडकीस येवू नये म्हणून युवकाचा मृतदेह विहिरीत फेकला. मात्र, अजिंठा पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे. अवघ्या २४ तासांत हा गुन्हा उघडकीस आणला.
सतीश राजु गवळे वय २६ वर्षे (रा. हळदा ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दिनांक ३/०२/२०२४ रोजी पोलिस ठाणे अजिंठा हद्दीतील हळदा येथील राजु तोताराम गवळे यांनी त्यांचा मुलगा सतीश राजू गवळे हा रात्री शेतात जातो असे सांगून गेला तो अद्यापपर्यंत घरी परत आला नाही, म्हणून त्यांनी मुलगा हरवल्या बाबत तक्रार दिली होती. मिसींग तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी त्याचा शोध घेणे सुरू केले असता दिनांक ०४/०२/२०२४ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास हळदा येथील कैलास करघे यांच्या शेतात एका तरुण मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स.पो.नि. अमोल ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता ही आत्महत्या नसून घातपात झाल्याबाबतचा संशय पोलिसांना आला होता.
या अनुषंगाने मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार मृत सतीश गवळे याच्या मृत्यूच्या कारणाचा पोलिस कसोशिने शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मृत सतीश गवळे याचे हळदा गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध आहे. तसेच तिला बोलण्यासाठी त्याने त्याचे नावावर तिला मोबाईल फोनचे सिमकार्ड सुध्दा घेवून दिलेले आहे. या माहितीचा धागा पकडून पोलिसांनी तपासास सुरूवात केली असता तांत्रिक विश्लेषण व संशयाच्या आधारे अल्पवयीन मुलीचा काका याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडे मृताविषयी विचारपूस केली असता तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यामुळे त्याच्यावर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून कसोशिने विचारपुस करता त्याने सांगितले कि, दिनांक ०२/०२/२०२४ च्या मध्यरात्री ११:०० वाजेच्या सुमारास मृत सतीश गवळे हा त्याची पुतणी हिला भेटण्यासाठी आला असताना त्याची चाहुल लागल्याने त्याने झोपेचे सोंग घेवून तसाच निपश्चित पडून राहिला होता. यावेळी मृताने मुलीच्या घराच्या दिशने इशार करून तो पुढे निघून गेला व थोडया वेळाने पुतणीसुध्दा घराबाहेर येवून तो ज्या दिशेने गेला त्याच दिशेला ती जात असल्याचे त्याने पाहिले.
त्यामुळे त्याचा लपून पाठलाग केला असता ते शेतातील एका कोप-यात बसलेले त्याला दिसले. यावेळी राग अनावर झाल्याने त्याने शेतातील दगड उचलून त्याच्या दिशेने भिरकवला असता पुतणी घाबरुन तिच्या घराच्या दिशने पळून गेली तर मुलगा सतीश हा त्याच्या शेताच्या दिशने पळून जावू लागल्याने त्याचा पाठलाग केला. त्याला पकडून खाली पाडून जवळ पडलेला दगडाने त्याच्या डोक्यात वार केले व नंतर त्याला जवळच असलेल्या कैलास करघे यांच्या विहीरीत फेकून दिले. त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे, असा लोकांचा समज होईल.
परंतु पोलिसांनी अत्यंत शिताफिने ही आत्महत्या नसून अल्पवयीन पुतणी सोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून त्याचा खून केला असल्याचे निष्पन्न केले. आरोपीचा बनाव हा उघड करून यातील मृत सतीश राजु गवळे वय २६ वर्षे रा. हळदा ता. सिल्लोड याच्या खुनाच्या गुन्हयात अल्पवयीन मुलीचा काका यास अटक केली असून त्याच्या विरुध्द पोलिस ठाणे अजिंठा येथे भादंवी कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. दिनेश कुमार कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल ढाकणे, स.पो.नि. शरद वाघुले, पोउपनि, पोलीस अंमलदार अक्रम पठाण, संदीप कोथलकर, भागवत शेळके, अरुण गाडेकर, सुरेखा काळे, संजय कोळी यांनी पार पाडली.