गंगापूर तालुक्यातील भिवधानोऱ्यातील शेतमजुराला चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंद ! दुचाकी चोरटाही लागला गळाला !!
छत्रपती संभाजीनगर, दि. २०- गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील शेतमजुराला चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने लुटणारे दोघे 24 तासांत गजाआड करण्यात आले. याशिवाय मोटरसायकल चोरटयासही शिताफिने जेरबंद करण्यात आले. गंगापूर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
पोलिस ठाणे गंगापूर येथे दिनांक १८/०१/२०२४ रोजी तक्रारदार दिनेश रुमसिंग कश्यप (वय ३४ वर्षे रा. पिपलीया गई, ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ह.मु. भिवधानोरा ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रार दिली की, ते भिवधानोरा येथील शेतवस्तीवर शेतमजूर म्हणून कामाला आहेत. दिनांक १८/०१/२०२४ रोजी भिवधानोरा येथील आठवडा बाजार असल्याने सायंकाळी ०६:३० वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी मालकाने त्यांचा पगार म्हणून त्यांना २०,००० रुपये दिले होते ते त्यांच्या जवळच होते. रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास अंधार झालेला असल्याने बाजार करून शेतवस्तीवर परत जात असताना भिवधानोरा गावाच्या अलिकडे दोन व्यक्ती दुचाकीवर भरधाव वेगात त्यांच्याजवळ आल्या व त्यांच्या हाताला धरून बळजबरीने ओढत शेतात नेले. दिनेश कश्यप यांनी आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्तींनी त्याच्या जवळ असलेला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देवून बाजार करून उरलेले दिनेश कश्यप यांच्या खिशातील १५,००० रूपये रोख व मोबाईल फोन असा एकूण २६,०००/- रुपये किंमतीचा माल बळजबरीने चोरून नेला. या तक्रारीवरून पोलिस ठाणे गंगापूर येथे दिनांक १९/०१/२०२४ रोजी कलम ३९४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास पोनि सत्यजीत ताईतवाले हे करित असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा भिवधानोरा व पखोरा येथील राहणारे दोन व्यक्तींनी केला आहे. यावरून गंगापूर पोलिसांची दोन वेगवेगळी पथके तयार करून पो.नि. ताईतवाले यांच्या पथकांने पखोरा येथील शेतवस्तीवर संशयिताचा शोध घेतला असता तो एका पडित गायरान जमिनीतील झाडाच्या आडोशाला लपून बसला होता. पोलिसांनी शेताच्या परिसरात सापळा लावून अत्यंत शिताफिने हालचाल न होवू देता आरोपी हा गाफिल असताना त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव सागर अशोक जाधव (वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापूर) असे सांगितले. यावेळी त्याला गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस करता तो पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार रामेश्वर बाळासाहेब चव्हाण याच्या सोबतीने केल्याचे कबुल केले. यावरून लगेच प्रमोद काळे, पोउपनि यांच्या पथकांने मिळालेल्या माहितीच्या आधारे भिवधानोरा येथील स्मशान भूमीच्या परिसरात लपून बसलेल्या दुसर्या आरोपीच्या अत्यंत शिताफिने मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून गुन्हयातील ३०००/- रुपये रोख व मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात १) सागर अशोक जाधव वय २२ वर्षे रा. पाखोरा ता. गंगापूर २) रामेश्वर बाळासाहेब चव्हाण वय ३० वर्षे रा. भिवधानोरा यांना अटक करण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
याचप्रमाणे पोनि, सत्यजीत ताईतवाले हे पखोरा येथील आरोपीला पो.स्टे. गंगापूर येथे घेवून जात असताना मोटरसायकल वरिल एक जण हा पोलिसांना बघून अत्यंत भरधाव निघाला. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने त्याचा १ किमी पेक्षा अधिक पाठलाग करून त्यास पखोरा येथील पारधी वस्तीजवळ थांबवून विचारपूस केली. तो पोलिसांना घाबरुन उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागला. त्याची कसोशिने विचारपुस करता त्याने त्याचे नाव सुरेश वाल्मिक घाणे वय २५ वर्षे रा. शहापूर घोडेगाव असे सांगून तो चालवित असलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस ही त्याने बकलवालनगर, वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केल्याचे कबुल केले आहे. यावरून गंगापूर पोलिसांचे सतर्कतेमुळे पो.स्टे. वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथील गुन्हा सुध्दा उघडकीस आणला. चोरी गेलेली मोटरसायकल स्प्लेंडर प्लस जप्त करण्यात आली आहे. आरोपी सुरेश वाल्मिक घाणे वय २७ वर्षे रा. शहापूर घोडेगाव यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी चार्ज गंगापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजीत ताईतवाले, पोलीस निरीक्षक, प्रमोद काळे, पो.उप.नि. पोलीस अंमलदार संदीप राठोड, राहुल वडमारे, संदीप गायकवाड, अजित नागलोद यांनी पार पाडली.