उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तात्काळ पाठवा, चार जिल्ह्यांतील १६ केंद्रावर होणार मूल्यांकन !
परीक्षा विभागाचे प्राचार्यांना आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.३० : पदवी परीक्षा अंतिम टप्प्यात असून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना तात्काळ कार्यमुक्त करावे , अशा प्रकारचे आवाहन परीक्षा विभागाच्या वतीने सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना करण्यात आले आहे . दरम्यान पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३० एप्रिल पासून सुरळीतपणे सुरू झाल्या आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मार्च एप्रिल २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना २ एप्रिलपासून तसेच नियमित परीक्षांना १६ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील तरतुदीनूसार सर्व अभ्यासक्रमांचे निकाल ३० दिवसांत जाहीर करणे बंधनकारक आहे. तसेच निकाल विहित वेळेत जाहीर करण्यात यावेत असे निर्देश कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठास वेळोवेळी प्राप्त होत आहेत. निकाल वेळेत जाहीर होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील संधी निकालावर अवलंबून असल्याने यासाठी सर्वस्व माध्यमातून सहकार्याची व सकारात्मक दृष्टिकोनातून मूल्यांकनाची कार्य पार पाडण्याची अपेक्षा आहे.
उन्हाळी २०२४ परीक्षांचे निकाल विहित मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्हयानिहाय १६ मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास ०८ मूल्यांकन केद्र निश्चित करण्यास कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मान्यता दिली आहे. विद्यापीठ प्रशासनामार्फत सर्व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना व प्राचार्यांना वारंवार आवाहन करण्यात येऊनही बरचेशे शिक्षक मूल्यांकन केंद्रावर रुजू होत नसल्याची माहिती विद्यापीठास प्राप्त होत आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
त्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर व त्यांच्या पुढील भवितव्यावर होत आहे. याच बाबीची गंभीर दखल घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दिनांक १५ मार्च २०२४ रोजीच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली. चर्चेअंती आगामी उन्हाळी २०२४ मध्ये होणा-या परीक्षेसाठी सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी ०८ एप्रिल २०२४ पासून ज्या विषयाच्या परीक्षा संपतील त्या-त्या विषयाच्या शिक्षकांना त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षकांना पूर्ववेळ १५ दिवसांकरिता मूल्यांकन केंद्रावर उत्तरपत्रिका मूल्याकंनासाठी कार्यमूक्त करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत.
तसेच प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील शिक्षकांना मूल्यांकनासाठी कार्यमूक्त केल्यानंतर मूल्यांकन केंद्रानी शिक्षक कर्मचारी रुजु झाल्याबाबतचा अहवाल त्याच दिवशी विद्यापीठास सादर करावा. सदरील बाब विद्याथ्र्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाची असल्याने याबाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तरपत्रिका मूल्यांकन पारदर्शीपणे करण्याबाबत सहकार्य करावे.
उत्तरपत्रिका मूल्यांकनाची सर्व संलग्नित महाविद्यालये तसेच विद्यापीठाशी सामूहिक जबाबदारी व कर्तव्य असल्याने उन्हाळी २०२४ परीक्षांचे सर्वांच्या सहकार्याने विहित वेळेत मूल्यांकन करण्यात येऊन ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्यासंबंधी सर्वांनी सामूहिकरित्या सहकार्य करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यामापन मंडळाचे संचालक डॉ.भारती गवळी यांनी केले आहे.