कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज आठवलेत ! महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटत असावं: राज ठाकरे
मुंबई, दि. २४- आपल्याकडचे महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकलेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज आठवलेत. महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटत असावं म्हणून ते बहुधा त्यांचं नावच घेत नव्हते आणि आता अचानक त्यांना महाराजांची आठवण येत आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी आज केली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, एखाद्या व्यासपीठावर दोन पक्षांचे प्रतिनिधी एकत्र आले म्हणजे युत्या, आघाड्या झाल्या असं होत नसतं. माझे नेते आणि मी महाराष्ट्रातील मतदारसंघांचा आढावा घेत आहोत, तिथल्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत आहोत. जे काय सांगायचं ते योग्य वेळ आली की सांगेनच.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या जो विचका झाला आहे तसा मी ह्या आधी कधीच पाहिला नव्हता. आता जनतेनेच ह्यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे, अन्यथा ह्यांना असंच वाटत राहणार की आमचं कोणीच वाकडं करणार नाही. आणि जनतेने वेळीच पाऊल उचललं नाही तर महाराष्ट्राचं राजकारण अजून गाळात जाईल.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
वरती केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरु आहे ते चूकच आहे. आणि फक्त आजच्यापुरता विचार करून चालणार नाही. आज अनेक तरुण तरुणी राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासमोर काय आदर्श आपण ठेवतोय? त्यांच्यासमोर जर शिवीगाळ करणारे, एकमेकांना वाट्टेल ते बोलणारे असे आदर्श असतील तर ते तरी का येतील राजकारणात?
मी जे आधी बोलतो ते कालांतराने लोकांना पटतं. मी जे बोलतो ते कायम विचारपूर्वक बोलतो. मराठा आरक्षणाबद्दल मी आधीच बोललो होतो, तसंच मतदान पण ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर घ्या हे मीच आधी बोललो होतो. जगभरात सर्वत्र जर मतदान मतपत्रिकेवर होत असेल तर ते भारतात ईव्हीएमवर का हा माझा प्रश्न तेंव्हाही होता आणि आज पण आहे. मध्यंतरी एक बातमी आली होती की मतदान झाल्यावर तुम्हाला एक स्लिप येणार, त्याचं काय झालं ?
महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची स्थिती भीषण आहे, अनेक भागांत दुष्काळ आहे, ह्या सगळ्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्रात मराठी मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळत नसेल त्यांना नोकऱ्या मिळत नसतील आणि महाराष्ट्र इतकं समृद्ध राज्य असून जर असं होत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, एखादा माणूस इतक्या थराला का जातो ह्याचा विचार पण करावा लागेल. इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची स्थिती कोणी आणली ह्याची पण चौकशी व्हावी.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवा पण आज किती राजकारण्यांना मराठीचा अभिमान आहे, किती प्रेम आहे त्यांना भाषेबद्दल? अशी लोकं काय मराठी भाषेसाठी पाठपुरावा करणार आहेत. मी नेहमी सांगतो की राज्यात हे तिथलेच स्थानिक पक्ष हवेत. कारण त्यांना त्या राज्याविषयी, त्या राज्याच्या भाषेविषयी आस्था असते, असेही राज ठाकरे म्हणाले.