खुलताबाद तालुक्यातील पडळसवाडीत अद्रक संशोधन केंद्र स्थापनेचा प्रश्न मार्गी लागणार, आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश !
छत्रपती संभाजीनगर, दि. ६- खुलताबाद तालुक्यातील अद्रक संशोधन केंद्र स्थापनेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून सदरील केंद्र स्थापनेसाठी त्वरित कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. आमदार सतीश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे.
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करावे यासाठी आ.सतीश चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात त्यांनी डिसेंबर 2022 व मार्च 2023 मध्ये झालेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. मात्र सभागृहात मंत्री महोदयांनी सदरील केंद्र स्थापनेचे आश्वासन देऊन सुध्दा काहीच कार्यवाही झाली नसल्याने यासंदर्भात बैठक आयोजित करण्याची विनंती आमदार सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.
कृषी मंत्र्यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत मंत्रालयात आज (दि.6) यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. सन 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी तीन महिन्यांच्या आत अद्रक संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यासंदर्भात शासनस्तरावर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी बैठकीत मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
अद्रक संशोधन केंद्र स्थापनेसाठी कमीत कमी 20 हेक्टर जागा लागते. मात्र गल्लेबोरगाव येथे प्रस्तावित अद्रक संशोधन केंद्र स्थापनेसाठीची नियोजित जागा कमी पडत असल्याने खुलताबाद तालुक्यातील पडळसवाडी येथील सरकारी जागेवर हे अद्रक संशोधन केंद्र उभारता येऊ शकते. यासाठी कृषी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकार्यांकडे जमीन संपादनासाठीची तात्काळ कार्यवाही करून सदरील परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी कृषी विद्यापीठाच्या संबंधित अधिकार्यांना दिले.
तसेच हे अद्रक संशोधन केंद्र लवकर सुरू व्हावे यासाठी कागदपत्रे व पाठपूरावा करण्यासाठी सदरील बैठकीत स्वतंत्र समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी परिषद, कृषी विद्यापीठ, मंत्रालयातील सबंधित अधिकार्यांची उपस्थिती होती.
महिला कृषी महाविद्यालय स्थापनेसाठी बृहत आराखडा तयार करा- कृषी मंत्र्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर शहरात महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी 27 डिसेंबर 2022 रोजी हिवाळी अधिवेशनात केली होती. तत्कालीन कृषी मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे खास बाब म्हणून महिला कृषी महाविद्यालय सुरू केल्या जाईल अशी घोषणा केली होती. मात्र यासंदर्भात देखील काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापनेसाठी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या दृष्टीने तात्काळ बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.