शासकीय कर्करोग रुग्णालयात पीईटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्या, आमदार सतीश चव्हाण यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी !
छत्रपती संभाजीनगर, दि. ३१– छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात पीईटी स्कॅन सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांना बाहेरच्या ठिकाणी तपासणी करावी लागते. त्यामुळे शासकीय कर्करोग रूग्णालयात अद्यावत असे पीईटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.31) मंत्रालयात हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन निवेदन दिले. आमदार सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग रूग्णालयात उपचारासाठी मराठवाड्यासह खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील रुग्ण उपचारासाठी येतात. याठिकाणी दररोज 250 ते 300 बाह्यरूग्ण तपासणी होते.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार कर्करोग असलेल्या रुग्णापैकी 90 टक्के रुग्णांचे पीईटी स्कॅन करणे आवश्यक असते. मात्र शासकीय कर्करोग रूग्णालयात पीईटी स्कॅनची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेर खाजगी ठिकाणी ही तपासणी करावी लागते. मात्र यासाठी रूग्णांना 15 ते 20 हजार रूपये खर्च येतो. गोरगरीब रूग्णांना आर्थिकदृष्ट्या हा खर्च परवडत नसल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe
पीईटी स्कॅन मशिनसाठी अंदाजे 30 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे. सदरील सुविधा कर्करोग रुग्णालयात उपलब्ध झाल्यास नाममात्र खर्चात रूग्णांना पीईटी स्कॅन करता येईल. त्यामुळे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात पीईटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आमदार सतीश चव्हाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.