मराठा आरक्षणाचा आताचा निर्णय हा सरसकट नाही, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार ! ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही: देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 29 – आमचे सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसी समाजाचे संरक्षण करण्याचीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आहे. जोवर भाजपा सरकारमध्ये आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही भाजपाची स्पष्ट भूमिका आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केले.
पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ओबीसींवर कुठल्याही स्थितीत अन्याय होऊ देणार नाही. मी स्वत: मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बोलणार आहे. त्यांना कुठेही असे वाटत असेल की, ओबीसींवर अन्याय होतो आहे, तर निर्णय सुधारणेला वाव आहे. तसेही आताचा निर्णय हा सरसकट निर्णय नाही. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र कसे सुलभतेने मिळेल, एवढाच निर्णय आहे. माध्यमांतील आकड्यांवर किंवा विषयांवर दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देणे हे योग्य नाही. कोणत्याही समाजावर अन्याय न करण्याचीच सरकारची अतिशय स्पष्ट भूमिका आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टिकणारे मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीत आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्याची कार्यवाही राज्य मागासवर्ग आयोग करते आहे. भाजपा जोपर्यंत सत्तेत आहे, तोवर आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. जेव्हा असे वाटेल की काही अडचणी आहेत, तेव्हा मी स्वत: वरिष्ठांशी बोलेन, असेही फडणवीस म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe